Visapur Murder Case | विसापूरात १७ वर्षीय तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या

Visapur Murder Case : विसापूर (बल्लारपूर): बल्लारपूर येथील एका १७ वर्षीय तरुणाची विसापूर येथे भररस्त्यात फिल्मी स्टाईलने पाठलाग करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. विराज आगधारी (रा. किल्ला वॉर्ड, बल्लारपूर) असे मृत तरुणाचे नाव असून या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण परिसरात कमालीची दहशत आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (पती-पत्नीने सुरु केला देहव्यापार, पोलिसांची धाड)

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर येथील ५ ते ६ गुंडांची एक टोळी दोन मोटारसायकलवरून सायंकाळच्या सुमारास विसापूर गावात दाखल झाली होती. या टोळीने विसापूर येथील तुकडोजी चौक परिसरात विराज आगधारी याला गाठून त्याचा पाठलाग सुरू केला. टोळीतील गुंडांनी सुरुवातीला विराजवर धारदार खंजराने हल्ला चढवला, मात्र विराजने प्रसंगावधान राखत गुंडांचा पहिला नेम चुकवला आणि तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावू लागला. सशस्त्र गुंडांच्या टोळीने विसापूर रेल्वे चौकाजवळ असलेल्या अली शेख यांच्या घराच्या फाटकासमोर म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले चौकात विराजला गाठले आणि त्याच्या डोक्यावर दगडाने जबर प्रहार केला. हा वार इतका भीषण होता की विराज गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच प्राणांत झाला. Visapur Murder Case

भररस्त्यात घडलेल्या या भीषण प्रकारानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र नागरिकांना येताना पाहून आरोपी दुचाकीने पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच विराजच्या बहिणीने घटनास्थळी धाव घेतली, भावाचा मृतदेह पाहून तिने केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता आणि यावेळी ती रडत रडत काही अज्ञात मारेकऱ्यांची नावे घेत होती. घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विपीन इंगळे आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Visapur Murder Case बल्लारपूर पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी विशेष तपास मोहीम

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ न्यायसहायक प्रयोगशाळेच्या म्हणजेच फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन खंजर आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करून रीतसर पंचनामा सुरू केला आहे. सध्या या हत्याकांडामुळे विसापूर आणि बल्लारपूर परिसरात तीव्र तणावाचे वातावरण असून पोलीस निरीक्षक विपीन इंगळे यांच्या नेतृत्वात फरार आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस सध्या आरोपींच्या मागावर असून बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. Visapur Murder Case

Leave a Comment