Chandrapur Fuel Crisis : चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने तीव्र इंधन टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह विशेषतः शेतकरी बांधवांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल पंपांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा मुळे जनजीवन प्रभावित झाले असून इंधनाअभावी वाहतूक व्यवस्थाही कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप करण्याची आग्रही मागणी केली आहे. (NHM कर्मचाऱ्यांना ५ वर्षाची मुदतवाढ द्या – खासदार धानोरकर)
सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असून शेतीची मशागत, नांगरणी व पेरणी पूर्व कामांसाठी ट्रॅक्टर्स व इतर कृषी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, डिझेल उपलब्ध नसल्याने शेतीची ही कामे पूर्णतः खोळंबली असून ऐन हंगामाच्या तोंडावर डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसभर पंपावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे त्यांच्या वेळेचा आणि श्रमाचा मोठा अपव्यय होत असून, शेतीची कामे खोळंबल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांची ही वाढती अडचण आणि शेतीचा हंगाम लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात म्हटले आहे. यासाठी जिल्ह्यातील ठराविक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांकरिता डिझेलचा स्वतंत्र राखीव कोटा ठेवण्यात यावा किंवा त्यांच्यासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून शेतकरी बांधवांना प्राधान्याने डिझेल मिळून त्यांना शेतीची कामे वेळेत पूर्ण करता येतील. Chandrapur Fuel Crisis
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याला होणारा इंधन पुरवठा सुरळीत करण्याबाबत संबंधित तेल कंपन्यांना तातडीने सूचना द्याव्यात, अशी विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. जोपर्यंत इंधन पुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी विशेष इंधन वितरण प्रणाली कार्यान्वित करावी आणि पेरणीचा हंगाम हातातून जाण्यापूर्वी या लोकहितकारी मागणीचा गांभीर्याने विचार करून प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत, अशी अपेक्षा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. Chandrapur Fuel Crisis